। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अशातच मंगळवारी (दि. 22) मुंबईच्या भांडूप परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. पावसामुळे भांडुपमधील खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेली एक मोठी संरक्षक भिंत कोसळली. भिंतीसोबत काही घरेही पडली. सुदैवाने, धोक्याची सूचना मिळाल्यानंतर घरांना तातडीने रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोर धरला असून या मुसळधार पावसामुळे डोंगराळ, टेकड्यांवरील भागांना मोठा फटका बसला आहे. अशातच भांडुपच्या खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास संरक्षक भिंत कोसळली. या भीतीसह पाच घरे 50 फुटांवरून खाली कोसळली आहेत. पावसाळ्यात डोंगराळ भागात दरड कोसळ्याची भीती असल्यामुळे तेथील अनेक घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस, महानगर पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोतल्या. यांनतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतिचे वातावरण तयार झाले आहे.







