बिहारमध्ये एक्सप्रेस पेटली; अनेक डबे जळून खाक

। मधुबनी । वृत्तसंस्था ।
बिहारच्या मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. १९) सकाळी उभ्या असलेल्या स्वातंत्र्य सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेसला आग लागली. हि आग सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी आटोक्यात आणण्यात आली. रात्री ही एक्सप्रेस मधुबनी स्थानकावर आली होती. ही ट्रेन रात्रभर स्थानकातच उभी होती. सकाळी अचानक ट्रेनच्या एका डब्याने पेट घेतला. बघता बघता ही आग अधिकच पेटत गेली. त्यामुळे गाडीतील सर्व सीट आणि वायर जळून खाक झाले. पहाटेच्या गार वाऱ्यामुळे ही आग अधिकच भडकत केली. जवळपास पाच डबे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला असमंतभर पसरल्या होत्या. बिहारच्या मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या स्वातंत्र्य सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेसला आज सकाळी भीषण आग लागली.

अचानक एक्सप्रेसने पेट घेतल्याने रेल्वे स्थानकात एकच धावपळ उडाली. बघता बघता रेल्वेचे डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्रचंड धूर आणि आगीमुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांनीही घटनास्थळाहून पळ काढला. अग्निशमन दल, पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने ही एक्सप्रेस पूर्णपणे खाली असल्याने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे अनेक डबे जळून खाक झाले आहेत. सध्या या गाडीतील आग नियंत्रणात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तसेच कुलिंग ऑपरेशन पार पडल्यानंतर ही गाडी स्थानकातून यार्डात नेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून तपास सुरूही झाला आहे. सध्या तरी आगीचं कारण सांगता येणार नसल्याचे पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओंनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version