एकाच रात्री पाच दुकाने फोडली
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरात एकाच रात्री पाच दुकाने फोडण्यात आली आहे. सध्या वातावरणात थंडी वाढल्याने चोरांचा सुळसुळाट झाला असून कर्जत शहरातील पाच दुकाने फोडल्याने कर्जत पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, बंद दुकानांचे शटर फोडून चोरी करण्याची कार्यपद्धती चोरट्यांनी अंगिकारली असून पोलिसांकडून व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.
चोरट्यांनी कर्जतमधील रेल्वे स्थानकजवळील डेक्कन जिमखाना ह्या हद्दीतील मुख्य चौकातील हॉटेल समर्थ कृपा व निर्मल पान शॉप व आणखी तीन दुकाने रात्री थंडीचा फायदा घेत फोडली. या चोरीत एकूण पाच दुकानांचा समावेश असून या पाच दुकानांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलेला दिसून येत आहे. समर्थ हॉटेल तसेच निर्मल पान ह्या दुकानांमधून चोरट्यांच्या हाताला फारसे काही लागले नसून फक्त चिल्लर चोरीला गेल्याचे समजते. परंतु, पुढे असलेले किराणा व कॅमेऱ्याचे दुकानातून जवळपास पाच ते दहा हजारांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. गेले कित्येक दिवस कर्जतमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सलग दुकान फोडीची ही दुसरी घटना आहे. याआधीदेखील काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन समोरील दुकाने फोडण्यात आली होती. चोरीचे प्रमाण कर्जत शहरात जास्त वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.