खालापूरात शिवसेना आमदारांची जीभ घसरली

। खोपोली । प्रतिनिधी ।
निकालानंतर उत्साहात शिवसेनेचे आ.महेंद्र थोरवे यांनी घरात घुसण्याची केलेली चिथावणी खोर भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत शेकापच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्तकेली आहे. नगरपंचायत खालापूरचा निवडणूकिचा बुधवारी निकाल लागला. शिवसेनेच्या सर्वाधिक आठ जागा आल्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. खालापूर शहरातून विजयी मिरवणुकीत आ.थोरवे आणि तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. खालापूर छत्रपती शिवाजी चौकात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून थोरवे यांनी आवेश पूर्ण भाषण केले. भाई ऐवजी दादा खालापूरात चालणार असून शिवसेनेच्या नादी लागतील तर शिवसैनिक घरात घुसतील असे वक्तव्य आमदारांनी केले. शेकापला बहुमताला दोन जागा कमी पडल्याने शेकापच्या गोटात शांतता होती. परंतु आमदारांच्या वक्तव्यानंतर निघालेली विजयी मिरवणूक संतोष जंगम यांच्या घरासमोरून जात असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. घोषणाबाजीने वातावरण तापले. परंतु पोलीस निरीक्षक अनिल विभुते आणि पोलीस पथकाने संघर्षाला वेळीच आवर घातल्याने संघर्ष टळला.

निवडून आल्यावर आमदार एका पक्षाचे राहत नसून जनतेचे असतात. आम्ही जनतेचा कौल मान्य केला. कोणताच पक्ष बहुमतात नाही, त्यामुळे आमदारांनी घरात घुसू ही वापरलेली भाषा खालापूर संस्कृतीत बसत नाही. तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेणारे मार्गदर्शन करत आहेत. -शिवानी जंगम, माजी नगराध्यक्षा, खालापूर नगरपंचायत

Exit mobile version