माथेरानमध्ये वाहनतळावर गाडीने घेतला पेट

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाच्या वाहनाला शनिवार ता. 7 रोजी सायंकाळच्या सुमारास आग लागली. नेरळ- माथेरान घाटरस्त्याने आल्यानंतर दस्तुरीनाका येथील पार्किंगमध्ये हि घटना घडली. टॅक्सी चालकांच्या सतर्कतेमुळे लोकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. सध्या उन्हाळी पर्यटन विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मुंबई विलेपार्ले येथील सिद्धेश पवार व अन्य कुटुंबीय हे आपल्या एमएच 02 एवाय 1135 या टाटा इंडिका कारने नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर प्रवास करत दस्तुरीनाका येथे पोहचले होते. वातावरणात असलेला अधिक तापमानामुळे वाहनातील गियर बॉक्स, तसेच ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने दस्तुरीनाका येथील पार्किंगमध्ये पोहोचताच वाहनाच्या बोनटमधून धुराचे लोट येऊ लागले. यावेळी स्थानिकांच्या मदतीने बोनट उघडताच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी आले. सदर घटना येथील पार्किंगमध्ये घडल्याने आजूबाजूला उभी असलेली वाहने, तसेच आगीचे स्वरूप पाहून पर्यटक, स्थानिकांमध्ये काही वेळापुरते भीतीचे वातावरण होते. मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. तर नेरळ- माथेरान टॅक्सी सेवा देणारे टॅक्सी चालक यांनी धावपळ करीत गाडीला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले.

Exit mobile version