मुरुडमध्ये मोरीचे काम रखडलेल्या स्थितीत

। कोर्लई । वार्ताहर ।
मागील दोन वर्षांपासून मुरुडच्या दस्तुरीनाक्यावरील धोकादायक मोरीचे काम अद्याप न झाल्याने पुन्हा यंदा पावसाळ्यात येथे एखादी दुर्घटना घडल्यास जिवित व वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांतून विचारला जात असून दिल्लीतील क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड ट्रस्टचे राज्य सचिव तथा व्हेंचर फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष तुफैल दामाद यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी येथील मोरीचे काम पुर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


मुरुड-आगरदांडा रस्त्यालगत नगरपरिषद हद्दीत याठिकाणी पुर्वी पासून पावसाळ्यात पाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोर्‍या बंद झालेल्या आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच या मोर्‍यांतील पाईप काढून काँक्रिटिकरण करण्यात यावे, तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील सत्याची नदीतील गाळ, साचलेले दगड, माती काढून साफ करण्यात यावी व मुरुड-आगरदांडा मुख्य रस्त्याला लागून नगरपरिषद अंतर्गत रस्ता काँक्रिटिकरण करण्यात यावा अशी मागणी मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदन देण्यात येऊन करण्यात होती. यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता तसेच दिल्ली येथील क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड ट्रस्टतर्फे निवेदन देण्यात आले होते. याची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुरहानी दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंडळ कार्यालयाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे व सदर कामाची निविदाकरिता आवश्यक कार्यवाही या कार्यालयाकडून करण्यात आली आहे व सदर काम सद्यस्थितीत निविदा स्तरावर आहे. निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदार नेमल्यावर कामाला सुरुवात करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप विभागीय अधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्ष मुनेंद्र चौधरी यांना कळविण्यात आले आहे.

Exit mobile version