नागोठण्यात तुरळक पावसातही विजेचा लंपडाव सुरु

। नागोठणे । वार्ताहर।

गेल्या काही दिवसांपासुन नागोठणे शहर व परिसरात तुरळक प्रमाणात पडणा-या पावसामुळे नागरिक सुखावले असले, तरी त्याचवेळी वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक व विविध प्रकारचे लहान-मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नसतांनाही वीजेचा लपंडाव सुरुच राहत आहे. दरम्यान विजेची बिले वसुली करतांना नागरिकांच्या मागे तगादा लावणारे वीज कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांकडुन वीज वितरण कंपनी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालया अंतर्गत असलेल्या नागोठणे शहर व नागोठणे परिसरात सध्या वीज वारंवार जाण्याचे प्रकार घडत आहेत. एकदा का वीजपुरवठा खंडित झाला की, तो परत येण्यास तास न् तास वाट पहावी लागत आहे. गेले काही दिवस तर मध्यरात्री, पहाटे, सकाळी, दुपारी अशा कोणत्याही वेळी विजपुरवठा खंडित होत आहे. वीज कशामुळे गेली हे विचारण्यासाठी कार्यालयात फोन केला तर कुणी उचलत नाही. तसेच मोबाईल वर फोन करावा तर तोही उचलण्याचा त्रास कर्मचार्‍यांना होत आहे. सोमवारी (दि.17) अशाचप्रकारे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी वीज कंपनीविरोधात समाज माध्यमांवर आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे वीज वितरणच्या नागोठणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वीज दुरूस्तीची सर्व कामे व वीज वाहिनी जवळून गेलेली झाडे तोडण्याची कामे पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच पूर्ण करुन विजेचा लपंडाव थांबवून जनतेला दिलासा द्यावा. अन्याथा एक दिवस तरी येथील जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असेही नागरिकांतून बोलले जात आहे.

दरम्यान यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे सांगितली. वीज वाहिनीवर बसणारे पक्षी मरून वाहिनी ट्रिप होणे, जंपर तुटने, झाडांच्या फांद्या वाहिनीवर पडणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. सोमवारी (दि.17) सकाळी निडी येथे वाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचेही नितीन जोशी यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version