नवगावमध्ये शेकाप एकतर्फी विजय संपादन करणार; आ.जयंत पाटील यांचा विश्‍वास

कॉर्नर सभांना उदंड प्रतिसाद

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नवगावमध्ये आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्याच माध्यमातून विकासकामे करण्यात आली आहे. भविष्यातही विकासकामांचा वेग असाच सुरु ठेवायचा आहे. या जोरावरच ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप एकतर्फी विजय संपादित करील, असा विश्‍वास शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी गुरुवारी नवगाव येथे व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी नवगावमध्ये कॉर्नर सभा घेत मतदारांशी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, तालुका चिटणील अनिल पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि.प.सदस्य संजय पाटील, सरपंच पदाच्या उमेदवार अंकिता जैतू, सुरेश घरत, तुकाराम लडगे यांच्यासह शेकापते सर्व उमेदवार उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी ज्येष्ठ कार्यकर्ते मधूकर राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. तसेच त्या परिवाराशी चर्चाही केली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते. त्यानंतर पक्षाशी गेले पन्नास वर्षे एकनिष्ठ असलेल्या कवळे परिवाराचीही भेट घेतली. या परिवाराच्यावतीने शेकापने निखिल कवळे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय गावातील सर्व समावेशक उमेदवारांना निवडणुकीत उभे करुन शेकापने समतोल साधला आहे.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना जयंत पाटील यांनी सरपंचपदाच्या उमेदवार अंकिता जैतू यांच्यासह पक्षाचे 12 ही उमेदवार भरघोस मतांनी निवडूण येणार असा विश्‍वास व्यक्त केला. नवगावमध्ये आतापर्यंत केलेली कामे शेकापच्या माध्यमातूनच झाली असून, यापुढेही गावामध्ये क्रीडा संकूल उभारण्याबरोबरच महिला बचत गटासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आग्रही राहणार आहोत. गावातील कोळीबाधवांसाठी जेट्टीचे विस्तारीकरण करणार असल्याचेही त्यांनी सुचित केले. शेकापचे जुने कुटुंब कटोर कुटुबिंयांचीही जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. तर दखणे परिवाराकडे स्नेहभोजन घेतले.

मुस्लिम समाजातर्फे स्वागत
शेकाप नेतेमंडळीचे गावातील मुस्लिम समाजातर्फेही कलाम मुजावर यांनी स्वागत केले. त्या स्वागताने उपस्थित सर्वजण भारावून गेली.

शेकाप कचेरीवर झालेल्या कॉर्नर सभेतही जयंत पाटील यांनी आतापर्यंत ग्रामपंचायतीवर असलेल्या प्रशासकामुळे अनेक अडचणी उद्भवल्या. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. मात्र आता सरपंचांसह पक्षाचे उमेदवार विजयी होणार असल्याने गावातील विकासकामे झपाट्याने होणार असल्याचा दावाही केला.

या कॉर्नर सभेत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी नवगावमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी सुरु करणार असून, महिलांना सक्षम करण्यासाठी विविध रोजगारभिमुख प्रशिक्षण देणार असल्याचे सुचित केले. सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.

Exit mobile version