निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत खर्डी ग्रा.पं. प्रथम

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला तर सार्वजनिक उत्सव मंडळ लोअर तुडील ता.महाड दुसरा क्रमांक आणि माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर थळ-वायशेत ता.अलिबाग यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच श्री भैहिरीदेवी महिला बचतगट पेण व ग्रामपंचायत आपटी, ता.खालापूर यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.
गणेशोत्सव काळातील दैनिक निर्माल्य संकलन, प्लास्टिक संकलन, पर्यावरणपूरक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क निर्मिती, कंपोस्टिंग व पर्यावरण पूरग गणेशमूर्ती विसर्जन तसेच पाणी व स्वच्छतेबाबत जनजागृती आणि लोकप्रबोधन आदि निकषांची पूर्तता करणार्‍या सहभागी गणेश मंडळाचे तज्ञांच्या समितीकडून परीक्षण करण्यात आले व उत्कृष्ट कार्य करणार्‍या मंडळांना विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. विजेत्यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व बक्षीस रक्कम देऊन लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा परिषद डॉ.ज्ञानदा फणसे यांनी कळविले आहे.

Exit mobile version