| रसायनी | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर फुडमॉलसह अन्य हॉटेल, पेट्रोल पंप आहेत. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत तेथील सांडपाणी पाताळगंगा नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. हरित लवादाकडे हे प्रकरण असतानाही असे प्रकार होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
फुडमॉल चालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाताळगंगा नदी आणि पर्यांवरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी दिला आहे.
फुडमॉल व हॉटेलच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी पाताळगंगा नदीपात्रात सोडले जात आहे. सर्व फुडमॉल्सचा कचरा नदी किनारी टाकला जाच असल्याने वायू प्रदूषण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांनी अनेकदा कारवाई करूनही सदर व्यावसायिक नियमांना फाट्यावर मारत असल्याचे चित्र आहे.
गेली काही महिने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी तसेच तोंडी तक्रार करण्यात आली आहे. प्रादेशिक अधिकारी आणि उपप्रादेशिक अधिकारी भोसले, फिल्ड अधिकारी लोहिया यांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना निर्देश दिले होते. दरम्यान, मंगळवारी पाठबंधारे उपविभागीय अभियंता भारत गुंटूरकर, शाखा अभियंता संदेश मेंगल, देशमुख यांनी सदर नाल्याची पाहणी करुन पंचनामा केला आहे.







