पेणमध्ये शेकापचाच बोलबाला;१६ ग्रामपंचायतींवर लालबावटा

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यात 26 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध घेऊन शेतकरी कामगार पक्षाने अगोदरच आपले खाते उघडले होते. मंगळवारी झालेल्या निकालामध्ये 26 पैकी 16 ग्रामपंचायतीवर लाल बावटा फडकला आहे.

26 ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे झेडपीची रंगीत तालीम होती. या रंगीत तालिमीमध्ये शे.का.पक्षाने गावपातळीवर योग्य प्रकारे युती आघाडी करून आपले वर्चस्व कायम राखले. तालुक्यातील एकमेव पक्ष असा आहे की, त्या पक्षातून विधानसभेच्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत कधीच आउट गोईंग सुरू नव्हती. फक्त आणि फक्त इनकमिंगच सुरू होती. माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर सर्वांनी विश्‍वास ठऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचीच सरशी झाली आहे.

कोलेटी शे.का.प राजू भोईर, मुंढाणी शे.का.प. सावित्री शेलके, कोप्रोली शे.का.प. प्रविण पाटील, मसद बु.शे.का.प. हरिश्‍चंद्र पाटील, कणे शे.का.प संगीता नंदकुमार पाटील, पाटणोली शे.का.प नलीनी वाघमारे, दादर शे.का.प. तेजस्वी संतोष म्हात्रे, सोनखार शे.का.प. दिलीप म्हात्रे, करोटी शे.का.प. सुशांत बरगे, वाशिवली शे.का.प. सखाराम पवार, वरसई शे.का.प मंदार, पाटील, सावरसई शे.का.प. आरती अनंत पाटील, वरप शे.का.प. गणेश मनवे, सापोली शे.का.प सुमन हंबीर, रोडे शे.का.प. दिनेश पवार, मळेघर शे.का.प आश्‍लेषा पेणकर तर कळवे, खरोशी, दुरशेत, जिते येथे भाजपने बाजी मारली. आंबिवली शिवसेना ठाकरे गट, निगडे शिवसेना शिंदे गट तर काराव, आमटेम, हमरापुर अपक्ष.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या दादर, डोलवी, आणि काराव ग्रामपंचायती मध्ये मोठी चुरस पहायला मिळाली. दादर ग्रामपंचायत मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाने भाजप च्या घशातून खेचून काढली. तर काराव ग्रामपंचायती मध्ये सामान्य अशी उमेदवार मानसी मंगेश पाटील अपक्ष ही निवडून आलेली आहे. तर डोलवी ग्रामपंचायती मध्ये माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांच्या चिरंजिवाला निसटत्या पराभवाला सामोरे जाण्यास परशूराम म्हात्रे यांनी भाग पाडले. महत्वाची बाब म्हणजे डोलवी ग्रामपंचायतीच्या निकालावर जे.एस.डब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या अधिकार्‍यांचे मोठे लक्ष लागून राहिले होते. पत्रकार कक्षेमध्ये वारंवार जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या अधिकार्‍यांचे फोन पत्रकारांना येत होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कंपनी प्रशासन देखील मोठया प्रमाणात सहभागी होते असेच म्हणावे लागेल.

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पहायला मिळाली. या गर्दी मधून एकच सुर ऐकायला येत होता तो म्हणजे लाल बावटे की जय त्यामुळे येणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा पाच वर्षा पुर्वीच्या पाच च्या पाच जिल्हा परिषदेच्या जागा निवडून आणणार असेच काहीसे चित्र पहायला मिळाले.

कोट
आजचा जो तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा यश आहे तो पुर्णत: कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व एकजुटीचा यश आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली म्हणूनच तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत शे.का.प.चे सरपंच निवडून आले. – धैर्यशील पाटील,माजी आमदार

वरपमध्ये नोटाला मतदान
वरप ग्रामपंचायती मधील प्रभाग क्र. 1 मध्ये अनुजमाती स्त्री. या जागेसाठी दोरे शोभा पांडुरंग, व दोरे धाकी उमा या दोन महिला परस्पर विरोधी उभ्या होत्या. यामध्ये दोरे शोभा पांडुरंग हिला 141 तर दोरे धाकी उमा हिला 26 तर नोटासाठी म्हणजेच वरील पैकी एकही नाही 162 मत मिळाली होती. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांना निर्णय घेताना थोडा वेळ गेला. परंतु, मतदारांचा उमेदवारां प्रती असलेला राग सर्वाधिक नोटाला मतदान पडलेला दिसून आलेला आहे.

चिठ्या टाकून निवड
आंबिवली, रोडे, आणि सावरसई या ग्रामपंचायतीतील अनुक्रमे प्रभाग क्र. 1, प्रभाग क्र.2, यामधील उमेदवारांमध्ये मतांची बरोबरी झाली होती. आंबिवली ग्रामपंचायती मध्ये पाटील ज्योती महेश 113, पाटील विनया विलास 113. रोडे ग्रामपंचायती मध्ये पाटील गोरखनाथ रामचंद्र 152, पाटील दिनेश चिंतामण 152, सावरसई ग्रामपंचायती मध्ये लोकरे किशोर गणेश 202, चिंबोरे सपना भगवान 202 अशी मते होती. मात्र चिठ्या काढून ग्रामपंचायत आंबिवलीमध्ये पाटील विनया विलास, ग्रामपंचायत रोडेमध्ये पाटील दिनेश चिंतामण तर सावरसई ग्रामपंचायतीमध्ये चिंबोरे सपना भगवान यांना विजयी घोषित करण्यात आले.

Exit mobile version