पेण तालुक्यात जि.प.ची एक, तर पं.स.च्या दोन जागांत वाढ

। पेण । संतोष पाटील ।
राज्य सरकारने महापालिका, नगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या आता सात जागांनी वाढणार आहे. त्यातील एक गट पेण तालुक्यातील आहे. आता तो नवीन मतदारसंघ कोणता असेल, याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. राज्य सरकारने मध्यंतरी महापालिका व नगरपालिकेत लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तर, याच धर्तीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणार्‍या इच्छुकांना अधिक जागा उपलध होतील.

लोकसंख्येचा विचार करता पेण तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषदच्या जागा असून, नवीन नियमांनुसार त्या जागा सहा होणार आहेत. तर पंचायत समितीच्या 10 जागांवरून 12 जागा होणार असून, जिल्हा परिषदेची 1 व पंचायत समितीच्या 2 जागा वाढल्याने इच्छुक उमेदवारांच्या नव्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेण तालुक्यात पाचही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर, पंचायत समितीच्या 10 पैकी 7 जागांवर शेकापक्ष, 1 जागा काँग्रेस, 2 सेना असा संख्याबळ आहे. नव्या नियमानुसार वाढलेल्या जागांचा फायदा हा शेतकरी कामगार पक्षालाच होईल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र, आगामी काळात होणार्‍या युत्या, आघाडींच्या गणितानुसार पेण तालुक्यात समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु, पेण तालुक्यात तरी तिरंगी लढत होण्याचे चित्र स्पष्ट होत आहेत. यामध्ये शेकाप ङ्गएकला चलोफचा विचार करत असल्याने साही जागांवर पुन्हा शेतकरी कामगार पक्षाचाच पुन्हा लाल बावटा फडकेल, असे जाणकारांचे मत आहे.

जागांवरील दृष्टीक्षेप
जिल्हा परिषद

सध्याच्या जागा59
वाढ होणार्‍या जागांची संख्या07
एकूण जागा होणार66

पंचायत समिती

तालुक्यांची संख्या15
जागा118
वाढ होणार्‍या जागा14
एकूण जागा होणार132


Exit mobile version