पोलादपुरात जमिनीला भेगा

अतिवृष्टी, भूस्खलनाचे नैसर्गिक संकेत?

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील करंजे गावातील पायटेवाडी येथे जमिनीला दूरवर रूंद भेगा पडल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यापूर्वी 2005 मध्ये पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावात, तर 2021 मध्ये वाकण गावामध्येही अशा भेगा पडल्या होत्या. यामुळे यंदाच्या पावसाळयात अतिवृष्टी तसेच भूस्खलन होण्याचे हे नैसर्गिक संकेत तर नाही ना, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भातशेताच्या जमिनीत भेगा पडल्याची माहिती ग्रामस्थ सुभाष घाडगे यांनी दिली असता पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीने करंजे पायटेवाडी येथे सहकाऱ्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी काही घरांच्या भिंतींनाही या भेगांमुळे तडे गेल्याचे तहसिलदारांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पायटेवाडी परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील जवळपासच्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात करंजे गावातील शाळेत तसेच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना तसेच, त्यांच्या राहण्याची जेवणाची व अन्य सुविधा पोहोचविण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासंदर्भात तहसीलदार घोरपडे यांनी गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांना सूचना दिल्या असून, बांधकाम उपविभाग पोलादपूर कार्यालयाला परिस्थितीची पडताळणी करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील यापूर्वीच्या प्रत्येक अतिवृष्टी व भूस्खलनाच्या घटनांपूर्वी तालुक्यात कुठल्या ना कुठल्या गावात मोठया लांबीच्या आणि सुमारे एक फूट रूंदीच्या भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून संभाव्य नैसर्गिक आपत्तीची ही पूर्वसूचना किंवा नैसर्गिक संकेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आगामी पावसाळयात अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून आपत्ती दरम्यान जनतेनेदेखील प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार घोरपडे यांनी यावेळी केले.

Exit mobile version