खबरदार! नववर्ष स्वागतासाठी पार्टीला जायचंय?…मग नक्की वाचा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नववर्ष स्वागतासाठी घराच्या बाहेर पार्टीचे बेत आखत असाल तर जरा सावधान…! अन्यथा कायदेशीर कारवाई झालीच म्हणून समजा. नववर्ष स्वागताला रात्री नऊ नंतर बाहेर पडलात तर जिल्ह्यात पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास जेलची हवाही खावी लागणार आहे. कोरोनाचे नियम मोडल्यास पर्यटक, हॉटेल, कॉटेज, लॉज, हॉल व्यवसायिकांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहेत.नववर्षाच्या अनुषंगाने आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी म्हटले आहे.नववर्ष स्वागताला रायगडात मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. राज्यात वाढत असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येत असून दोन डोस घेतले आहेत का, मास्क परिधान केले आहेत का, याची तपासणी नाक्यांनाक्यावर केली जात आहे. जिल्हा पोलिसांकडून भरारी पथक तैनात केली आहेत. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.

रात्री 9 नंतर सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनारी पाच पेक्षा अधिक जण एकत्रित आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. हॉल, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, कॉटेज यावरही पोलिसांची पाळत राहणार आहे.नववर्षाच्या स्वागत काळात महिलांशी असभ्य वर्तन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असून साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रात्री मद्य प्राशन करून वाहन चालवताना मिळाल्यास गुन्हा दाखल करून अटक केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नववर्षाचा आपला पहिला दिवस कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी घरातच नववर्ष स्वागत करणेच योग्य आहे हे विसरून चालणार नाही.

Exit mobile version