रायगड विभागात एस.टी. सेवा पूर्ववत

50 टक्के फेर्‍या झाल्या सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपकरी कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यात वाढ झाली असून आतापर्यंत रायगड विभागातील 1 हजार 644 पैकी 1 हजार 133 कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. तर 231 कर्मचारी अजूनही संपात सहभागी असून ते देखील काही दिवसात हजर होतील असा विश्‍वास विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केला. आज विभागात तब्बल 50 हजार किलोमीटर चा टप्पा एसटीने पुर्ण केला आहे. 1 हजार फेर्‍या पुर्ण झाल्याने एक दिवसात 16 लाख उत्पन्न मिळवले असल्याची माहितीदेखील अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

रायगड विभागातील प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, चालक तथा वाहक आणि वाहक असे एकूण 1 हजार 644 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी न्यायालयाच्या आदेशानंतर 280 कर्मचारी पुन्हा सेवेत हजर झाले आहेत. त्यामुळे एकुण हजर कर्मचारी संख्या 1 हजार 133 झाली आहे. तर अजूनही संपात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या 231 एवढी आहे. मात्र हे कर्मचारी देखील येत्या काही दिवसात पुन्हा सेवेत हजर होतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्कयाहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली.

28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एस.टी. कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संपसोडून कमावर हजर झाले आहेत.कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version