। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणातील विविध किनार्यावर विणीच्या हंगामात अनेक ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येतात. तालुक्यातील मालगुंड येथील गायवाडी किनार्यावर 16 फेब्रुवारी 2022 ला ऑलिव्ह रिडलेचे पहिले घरटे आहे. हा किनारा विस्तीर्ण आणि शांत असल्यामुळे अनेक कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली. पुर्वीही येथे कासवे अंडी घालून येऊन जात होती; परंतु त्यांची अंडी वन्यप्राण्याकडून नष्ट केली जात होती. याबाबतची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्यानंतर कासव संवर्धनासाठी मालगुंड येथील सर्पमित्र ॠषीराज जोशी यांना विचारणा करण्यात आली. ॠषीराजनेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत काम सुरु केले. मालगुंड येथील किनार्यावर समुद्राचे पाणी येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी हॅचरी करण्यात आली आहे. आतापर्यंत 11 हॅचरी केल्या असून त्यामध्ये सुमारे 1 हजार 52 अंडी आहेत. आतापर्यंत त्यातील 251 पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात झेपावली आहेत. ॠषीराज यांच्या अंदाजानुसार 60 टक्के पिल्ले सुरक्षितरित्या अंड्यामधून बाहेर येतील.
पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की वाळूत खड्डा तयार करतात. त्यामुळे पृष्ठभागाकडील बाजू थोडीशी आतील बाजूस दबली जाते. वाळूवर पाऊस पडल्यामुळे किंवा अधिक दव पडला की वाळू कडक होते. यंदा अवकाळी पावसामुळे हा प्रकार घडल्याचे निरीक्षणही कासवमित्रांनी मालगुंड येथे नोंदवले आहे. हॅचरी केलेल्या वाळूत झालेले बदल लक्षात आल्यानंतर त्यावर परडी टाकून ठेवली जाते. पुढे दोन दिवसात पिल्ले बाहेर पडतात. परडी असल्यामुळे पिल्ले एकाच ठिकाणी राहतात. परिणामी त्यांना समुद्रात सुरक्षितरित्या सोडणेही शक्य होते. ऑलीव्ह रिडले कासवं आढळून आल्यामुळे मालगुंड किनारा कासव संवर्धनासाठी वन विभागाकडे नोंदला गेला आहे.
दोन हॅचरीवर उन्हाचा परिणाम
यंदा कडक उन्हाळा आहे, त्यामुळे त्याचा परिणाम कासवांची पिल्ले बाहेर पडण्यावर होऊ नये यासाठी हॅचरी करताना विशेष काळजी घेण्यात आली होती. अंडी घातल्यानंतर साधारणपणे पन्नास दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. उन्हामुळे वाळूचा पृष्ठभाग कडक होतो आणि पिल्लांना बाहेर येणे शक्य होत नाही. परिणामी ती आतमध्ये अडकून मृत पावतात. हा प्रकार यंदा दोन हॅचरीमध्ये आढळून आला.
किनार्यावरील कासवांची अंडी कोल्हे, मोकाट कुत्रे यांच्यापासून सुरक्षित ठेवावी लागतात. हॅचरीमुळे वन्यप्राण्यांचा अंड्यांचा वास येत नाही. त्यामुळे जास्त लक्ष ठेवावे लागत नाही; मात्र उन्हामुळे काहीवेळा पिल्ले अंड्यामधून लवकर बाहेर पडतात. यासाठी नियमित लक्ष ठेवावे लागते.
षीराज जोशी, कासवमित्र