रोह्यात रा.काँ.च्या उपसरपंचाकडून महिला सरकारी कर्मचार्‍याला मारहाण

। रोहा । जितेंद्र जोशी ।
राज्याच्या विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक सादर करत असताना रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उपसरपंचाने मात्र वीज महामंडळाच्या एका महिला कर्मचार्‍यावर शक्ती प्रयोग केला. तसेच तिचा विनयभंग केल्याने निडी तर्फे अष्टमी येथील उपसरपंच उत्तम नाईक व त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात विनयभंग, सरकारी कामात अडथळा करणे, शिवीगाळ, मारहाण अशा विविध गुन्ह्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री याप्रकरणी लक्ष घालून पिडीत महिलेला न्याय मिळावा, यासाठी कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील सर्व महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.

रोहा तालुक्यातील वीज महामंडळाच्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत असलेली महिला तिच्या कार्यालयात एकटी दैनंदिन कामकाज करत होती. त्यावेळी निडी ग्रामपंचायत उपसरपंच अन्य दोन साथीदारांसह संबंधित कार्यालयात येऊन स्ट्रीट लाईटबाबत तक्रार करत होते. संबंधित महिला अभियंता हिने तक्रार निवारण करण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांशी संपर्क साधून तक्रार निवारण करण्याबाबत सूचना दिल्या. पण उत्तम नाईक यांनी त्यांच्याशी वाद सुरु केला. तसेच महिला कर्मचार्‍याला धक्काबुक्की करीत तिचा विनयभंग केला. यावेळी कार्यालयात तक्रार निवारण करण्यासाठी गेलेला अन्य एक ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी उपस्थित होता.

महिला कर्मचार्‍याला दिवसा ढवळ्या अर्वाच्य भाषेत झालेली शिवीगाळ, मारहाण व अन्य प्रकारामुळे वीज महामंडळाच्या सर्व महिला कर्मचारी भयभीत आहेत. याप्रकरणी पिडीत महिला कर्मचार्‍याच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याने महिला कर्मचारी भितीच्या छायेत असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. रोहा पोलिस निरीक्षक संजय पाटील याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version