ग्रामीण भागात घरोघरी मातीच्याच चुली

| रेवदंडा | प्रतिनिधी |

शेगडी, गॅसच्या जमान्यात आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीच्याच चुली पहावयास मिळतात. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीवर जेवण बनविले जाते. त्यामुळे इंधनखर्चातही बचत होत असल्याने अधिकची पसंती मिळत आहे. परिणामी, चुलींना मागणी कायम असल्याचे व्यावसायिक सांगतात.

अलिबाग तालुक्यातील वरंडे ग्रामपंचायत हद्दीत आंबेपूर या गावात येथील स्थानिक कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय मातीच्या चुली तसेच मातीपासून मडकी, तवे आदी वस्तू बनविण्याचा आहे. शेतातील चिकट मातीच्या सहाय्याने अप्रतिम कलाकौशल्याने येथील कुंभार समाज मातीच्या विविध वस्तू घडवित असतात. आजही इलेक्ट्रिक व गॅस शेगडीच्या जमान्यात मातीच्या चुलीची मागणी ग्रामीण भाागात मोठ्या प्रमाणात आहे, असे येथील व्यावसायिकांनी सांगितले. ग्रामीण भागातील बहुसंख्य कुटुंबात जेवण करणे, पाणी गरम करणे आदींसाठी मातीच्या चुलीचा वापर केला जातो. त्यासाठी नजीकच्या जंगल भागातील लाकुडफाटा अगदी स्वस्त दराने, त्वरित उपलब्ध होत असल्याने आजही मातीच्या चुलीचे मोठे महत्त्व ग्रामीण भागात टिकून आहे.

Exit mobile version