| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये ग्रामीण भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मार्चच्या दुसर्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढच होत आहे. मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात 35 अंश सेल्सिअस असणारे तापमान आता मात्र 37 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुपारी उन्हाचा जोर जास्त असल्याने बाजारपेठांमध्ये सामसूम दिसून येत आहे. उन्हापासून व उकाड्यापासून बचावासाठी पंखे, कूलर, एसीची मदत घेतली जात आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्प, रुमाल, गॉगल, छत्री वापरू लागले आहेत. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने पुढील काळात हवामान कोरडेठाक राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापुढील काळात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने उष्माघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे उन्हात कामे करणे टाळावे.
उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यावे. फळांचा रस, पालेभाज्या, सॅलड घ्यावे. ताक, उसाचा रस याचा आहारात उपयोग करावा. उन्हाळ्यात कष्टदायक कामे टाळावीत. दुपारी बारा ते चार या वेळेत कष्टदायक कामे करू नयेत विश्रांती घ्यावी. सैल व सुती कपडे वापरावेत. नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. सुनील नखाते,
तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल