संभाजीनगरमध्ये महायुतीत रस्सीखेच सुरू

| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |

महायुतीकडून लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून कुठला पक्ष निवडणूक लढवणार? उमेदवार कोण असेल? यावरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवाराची घोषणा होईल, असे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. पण, हा मुहूर्त टळला. त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. एकीकडे ही जागा आम्हाला सुटेल असा दावा शिंदे गटाचे पदाधिकारी करत असताना दुसरीकडे भाजप अद्यापही प्रयत्न सोडायला तयार नाही. दरम्यान, दोन दिवसांत या बाबत निर्णय होऊ शकतो.

‘आजवर युतीत येथून आम्हीच लढलो आहोत. त्यामुळे संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक सीट आहे, ती आम्ही जिंकणार आहोत मग सोडणार कशी?’ असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे या मतदारसंघात आम्ही तीन वर्षांपासून काम करत आहोत. बूथस्तरापर्यंत आम्ही पोचलो आहोत. त्यामुळे आम्ही ही जागा लढलो तर दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. असे दावे सुरूच असल्याने, वरिष्ठ स्तरावरून याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मंगळवारी पाडव्याच्या मुहूर्तावर याबाबत घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही दोन्ही पक्षाकडून रस्सीखेच सुरू असल्याने लढणार कोण आणि उमेदवार कोण असणार याबाबत अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.

Exit mobile version