नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास टाळाटाळ
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरामध्ये मठाच्या स्मशानभूमी जवळ अवधूत मंदिर आहे. या अवधूत मंदिराचा परिसर जवळजवळ 96 गुंठे इतका आहे. हा सर्व परिसर श्रीवर्धन शहरातील मृत पावलेल्या नागरिकांच्या उत्तरकार्यासाठी राखीव ठेवलेला आहे. या ठिकाणी दहावे, बारावे त्याचप्रमाणे सर्व प्रकारची उत्तर कार्य केली जातात. परंतु, दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटनामुळे श्रीवर्धनमध्ये सहलीच्या येणाऱ्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर झालेली आहे. याच अवधूत मंदिर परिसरात सहलीच्या असंख्य बस पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे शहरात कोणत्याही नागरिकाचे मयत झाल्यानंतर उत्तरकार्य करण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे.
अवधूत मंदिर परिसरात सहल आयोजक बिनधास्तपणे जेवण बनवताना अनेक वेळा आढळून येतात. जेवण बनवून झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साफसफाई करण्यात येत नाही. उभ्या राहिलेल्या बसमधून देखील खूप मोठ्या प्रमाणावर कचरा या मंदिर परिसरात फेकण्यात येतो. सतत या ठिकाणी येणाऱ्या सहलींच्या बसेसमुळे व जेवण बनवण्याच्या प्रकारामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. श्रीवर्धनमधील अतिशय जागरूक असे हे अवधूत देवस्थान आहे. याबाबत श्रीवर्धन नगरपरिषदेचे अगोदर असलेले मुख्याधिकारी व आत्ता असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे अनेक वेळा चर्चा करून त्या ठिकाणी सूचना फलक लावावा याबाबत सूचना दिल्या आहेत.
मात्र, नगर परिषदेकडून अशी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. एकूणच संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर बनलेली असून, समुद्रकिनारी असलेल्या अनेक हॉटेल्स व रिसॉर्टला कस्टमर पोहोचू शकत नाहीत. कारण समुद्राकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा चार चाकी वाहने पार्किंग केल्यामुळे संपूर्ण रस्ता जाम होऊन गेलेला असतो. काही दिवसापूर्वी श्रीवर्धनच्या र.ना. राऊत विद्यालयाच्या मागील पटांगणामध्ये तात्पुरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, शाळा प्रशासनाने या ठिकाणी चर खणल्यामुळे त्या ठिकाणचे पार्किंग बंद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची पार्किंगची सुविधा येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली जात नाही. पर्यटकांकडून पर्यटन कर वसूल केला जातो. परंतु, त्यांना सुविधा शून्य प्रमाणात दिल्या जातात. याबाबत श्रीवर्धनच्या आ. बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याजवळ देखील अनेक वेळा चर्चा करून सुद्धा या प्रकारावरती अद्याप तोडगा निघालेला नाही. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुशोभीकरण केलेल्या बंधार्याच्या दांडे कडील बाजूला हेलीपॅड आहे. या हेलीपॅडच्या परिसरामध्ये चार ते पाच एकर जागा वनखात्याच्या अखत्यारीतील मोकळीच आहे. या जागेवर पे अँड पार्कची सुविधा नगरपरिषद व वनखात्याने संयुक्तपणे करून द्यावी. अशी या ठिकाणांच्या नागरिकांची मागणी आहे. शासनाकडून पर्यटन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. परंतु येणाऱ्या पर्यटकांसाठी जर का पार्किंगचीच सुविधा उपलब्ध नसेल, तर पर्यटकांनी गाड्या कुठे उभ्या करायच्या? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पार्किंगची मागणी
श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन पार्किंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
