मोदीविरोधी लाटेत भाजपाचा सुपडासाफ होणार

अनंत गीतेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आगरसुरे येथे शनिवार, (दि.13) एप्रिल रोजी जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि मणिपूर ते मुंबई अशी जनसंवाद यात्रेला मिळालेल्या देशातील जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या निवडणुकीत मोदीविरोधी त्सुनामी येणार असून, त्यामध्ये भाजपाचा सुपडासाफ होणार आहे.

यावेळी गीते म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत मोदीलाट वगैरे काही नव्हती, कारण त्यावेळेला भाजप जिंकली हे अर्धसत्य आहे तर काँग्रेस हरली हे देखील अर्धसत्य आहे, त्यावेळी काँग्रेस आघाडीला 39.50% मते मिळाली तर भाजपला 41% मते मिळाली. यामध्ये केवळ 1.50% मते भाजपला जास्त मिळाली, आणि मीडियाने फक्त भाजप जिंकली हे सांगितले पण मतांची टक्केवारी सांगितली नाही. यावेळी इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सभेला इंडिया आघाडीचे नेते तसेच शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा (उद्धव ठाकरे गट) शिवसेनाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पिंट्या ठाकूर, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, शंकरराव म्हात्रे, किशोर जैन, विष्णू पाटील, चंद्रकांत मोकल व इतर सर्व इंडिया आघाडीचे नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

तटकरेंना जागा दाखवा
शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, रायगडच्या जनतेची घोर फसवणूक करणार्‍या तटकरेंना त्यांची जागा दाखवून टकमक टोकावरुन कडेलोट करायचा आहे. इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला अनंत गीते यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन आ. पाटील केले आहे.
Exit mobile version