म्हसेवाडी येथील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात तीन संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

| माणगाव | सलीम शेख |

माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथील एका वृद्ध महिलेला लुटून तिची हत्या करण्यात आल्याची घटना दि.२१ दुपारी १.३० ते ३.१५ वाजण्याच्या दरम्यान म्हसेवाडी ता. माणगाव गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या राहते घरात घडली. त्याबाबतची फिर्याद विनोद श्रीरंग सावंत (वय ४७) राहणार म्हसेवाडी ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी तीन संशयीत आरोपींना माणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

या घटनेमुळे माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी विनोद श्रीरंग सावंत यांची आई श्रीमती संगीता श्रीरंग सावंत (वय-६९) राहणार म्ह्सेवाडी ता. माणगाव या घरात एकट्याच असताना फिर्यादी यांच्या घरात आरोपी यांनी प्रवेश करून घरात असलेल्या मोरीत पाण्याने भरलेल्या टपात फिर्यादी यांची आई श्रीमती संगीता श्रीरंग सावंत यांची मान पकडून तोंड व नाक पाण्याने भरलेल्या टपात बुडवून तिचा श्वासोच्छवास बंद करून तीच्या सोबत झटापटी करून तीच्या कानातील, सोन्याच्या कुडी हाताने जबरदस्तीने खेचून कानाच्या पाली फाडून रक्तबंबाळ केले. नंतर गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने तोडून व हातातील सोन्याच्या चार बांगड्या चोरून महिलेची हत्या केली. या घटनेत आरोपी मारेकऱ्यांनी ६० हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याच्या कुडी त्याला साखळी जोडलेली अंदाजे दीड तोळे वजनाची जुनी वापरती, ८० हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याची बोरमाळ मनी असलेली अंदाजे २ तोळे वजनाची जुनी वापरती, १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दोन्ही हातातील सोन्याच्या एकूण ४ बांगड्या चार तोळे जुने वापरते, असा एकूण ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनी श्री. मोहिते, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

या गुन्ह्याप्रकरणी माणगाव पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतल असून त्यांची चौकशी सुरु आहे. सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा रजि.नं४३/२०२३ भादवि संहिता कलम ३०२, ३९४,३४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. मोहिते करीत आहेत.

Exit mobile version