पहिल्या वनडेत मधल्या फळीने घात केला

कप्तान राहुलकडून सहकार्‍यांवर टीकास्त्र
। पार्ल । वृत्तसंस्था ।
पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेतील पराभवासह भारतीय कर्णधार केएल राहुलने पराभवाचं खापर मधल्या फळीवर फोडलं आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये केएल राहुल म्हणाला, हा सामना खूप काही शिकण्यासारखा होता. यामध्ये आम्ही चांगली सुरुवात केली. पण आम्ही मधल्या षटकात विकेट्स गमावत राहिलो, त्यामुळे सामना आमच्या हातातून निसटला. मधल्या षटकात विकेट्स गमावणे टाळावे लागेल. तरच आम्ही समोरच्या संघाला रोखू शकतो असा दावा राहूलने केला आहे.
कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. बुधवारी उभय संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवनच्या 79 धावा, विराट कोहलीची अर्धशतकी खेळी आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या. शार्दुलने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारताची मधली फळी ढासळल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला.

खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती : राहुल
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या विकेटवर बोलताना केएल राहुल म्हणाला, मी 20 षटकांच्या पुढे फलंदाजी केली नाही. पण त्यात फारसा बदल झाला आहे असे वाटत नाही. जेव्हा मी धवन आणि विराटशी विकेटबद्दल बोललो तेव्हा त्यांनी ती अधिक चांगली असल्याचे सांगितले. तो म्हणाला की खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर फलंदाजी करणे सोपे होते. दुर्दैवाने त्यांच्यातील भागीदारी केवळ 92 धावांचीच होऊ शकली.

दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. त्याने आमच्या गोलंदाजांवर सतत दबाव ठेवला. मधल्या षटकात आम्ही विकेट घेण्यात अयशस्वी झालो, त्यामुळे त्यांना 290 पेक्षा जास्त धावा करता आल्या. याशिवाय आमच्या बाजूने विराट-धवनव्यतिरिक्त मोठी भागीदारी होऊ शकली नाही. – के.एल. राहुल, कर्णधार

भारताची मधळी फळी कमकुवत
46 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर पुढे शिखऱ धवन आणि विराट कोहलीने डाव सावरला, दुसर्‍या विकेटसाठी या दोघांनी 92 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला. धावफलकावर 138 धावा असताना शिखर धवन बाद झाला. डावखुरा गोलंदाज केशव महाराजचा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला आणि धवन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर विराटही खेळपट्टीवर फार वेळ टिकला नाही. (51) धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर त्याने बावुमाकडे झेल दिला. हे दोघे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पदार्पण करणार्‍या वेंकटेशन अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिघेही स्वस्तात बाद झाले. खरंतर या युवा खेळाडूंना काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी होती, ती त्यांनी गमावली. अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरन 43 धावांत 50 धावा फटकावल्या आणि तो नाबाद राहिला, मात्र तोवर सामना हातून निसटला होता.

Exit mobile version