पहिल्या टप्प्यात ‘इंडिया’ आघाडीचे पारडे जड

| मुंबई | प्रतिनिधी |

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील ज्या आठ जागांवर शुक्रवारी (दि.19) मतदान झाले. त्यापैकी सर्व जागांवर 2014 मध्ये भाजपने विजय मिळविला होता. तर मागील निवडणुकीमध्ये भाजपला या पैकी तीन जागांवरच विजय मिळविण्यात यश आले होते. यंदाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे पाहता यावेळीही भाजपपेक्षा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचेच पारडे येथे जड वाटत आहे.

मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न पाहणार्‍या भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच उत्तर प्रदेशात सर्व जागांवर भाजपला विजय मिळेल असा दावा करायला सुरुवात केली होती. चुकीच्या मुद्यांच्या आधारे समाजाची एक विशिष्ट मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न करायचा, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवसिद्ध धोरणाचे प्रतिबिंबच या दाव्यांमध्येही दिसत होते. अशातच विरोधकांच्या आघाडीतील मतभेदांमुळे तर, भाजपकडून करण्यात येत असणार्‍या दाव्यांना अधिकच बळ मिळत होते. परंतु जशी निवडणुकीची वेळ जवळ येत गेली तसतसे पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान झाले त्या जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले.

या निवडणुकीमध्ये येथील समीकरणे बदलली आहेत. सीबीआयची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे मायावती यांनी तडजोड केल्याचे दिसत आहे तर, राष्ट्रीय लोक दलानेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी ‘एकला चलो रे’चा दिलेला नारा आणि पहिल्या टप्प्यातील आठपैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार देत मुस्लिम मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version