लाटांच्या कुशीत, वार्‍याच्या स्वरांत कवितेची गाज

समुद्रावरील कवि संमेलनास प्रतिसाद
| मुरुड जंजिरा । वार्ताहर |
निरभ्र आकाश,समोर अथांग पसरलेला निळाशार दर्या, नारळी, पोफळीच्या बागेत लाटांच्या कुशीत, वार्‍याच्या स्वरात कवींच्या सागरावरील काव्याची गाज उपस्थितांना मोहवून गेली. निमित्त होते कोमसापच्या समुद्रावरील काव्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुरूड-जंजिरा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुरूडच्या समुद्र किनारी समुद्रावरचे कवी संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक एल.बी.पाटील यांच्या हस्ते झाले. या समारंभाच्या अध्यक्षपदी रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधीर शेठ तर प्रमुख पाहुणे म्हणून कोमसापचेे केंद्रीय जिल्हा रायगड प्रतिनिधी गणेश कोळी, रायगड जिल्हा समन्वय अ.वि.जंगम, जिल्हा खजिनदार रेखा कोरे, जिल्हा सहकार्यवाह मच्छिंद्र म्हात्रे, डॉ. ना.म.जोशी तसेच मुरूड जंजिरा शाखेेचे अध्यक्ष संजय गुंजाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी, रायगड जिल्हा साहित्यिक दृष्ट्या सक्षम आहे.कोमसापने अनेक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कवी मनाची माणसं निर्माण झाली पाहिजेत,कविता म्हणत जगलं पाहिजे ,कविता सुचण्यासाठी लागणारे निसर्गरम्य वातावरण मुरुडला असल्याने मुरुडच्या कविसंमेलनात जन्माला येणार्‍या कविता व साहित्य देशात नावाजले जाईल याची मला खात्री आहे असे सांगितले. प्रास्ताविक मुरुड जंजिरा शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी केले.

यावेळी रायगड जिल्ह्यातील निमंत्रित गझलकारांचा मुशायरा तसेच खुले कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मुरुड जंजिरा शाखेच्या उपाध्यक्षा उषा खोत, अरुण कार्याध्यक्ष अरुण बागडे, सचिव नैनीता कर्णिक, सिद्धेश लखमादे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली संजय गुंजाळ यांनी केले.

Exit mobile version