जनतेपर्यंत आवाज न पोहचू देण्यासाठी कृषीवल पेपर जाळले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागचे शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून मिळणार्या वागणूकिमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. तसेच त्यांच्याकडून मिळणार्या शिव्यांमुळे कार्यकर्ते बेजार असल्याचे वृत्त कृषीवलने दि. 22 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ही बाब चांगलीच झोंबल्यामुळे आमदारांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मानसी दळवी यांनी पत्रकार परिषदेत खोटी बातमी छापल्याचा कांगवा करीत आम्ही किती संयमी आहोत, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तसेच आरोप करण्याच्या ओघात त्यांची देखील जीभ सरकल्याचे दिसून आले.
आढावा बैठकित शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमदार व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा केवळ अलिबाग तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु होती. त्यामुळे बिघडलेल्या आमदारांनी त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून तातडीने पत्रकार परिषद बोलवत सारेकाही आलबेल असल्याचे सांगितले. याशिवाय विहूर जमिन प्रकरणाबाबत खुलासा देताना खरेदीदार मित्र असल्याने आर्थिक व्यवहार न करता केवळ मदत केली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
कृषीवल वृत्तपत्र जाळून आवाज दाबण्याचा प्रयत्न
अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम नेहमीच कृषीवलने केले आहे. आमदारांप्रती कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी कृषीवलने समोर आणली. तसेच आमदारांकडून मिळणार्या शिव्यांमुळे शिवसैनिक बेजार असून त्यांच्यावर होणारा अन्याय कृषीवलने जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेपासून सत्य लपवून ठेवण्यासाच्या उद्देशाने कृषीवल जाळण्याचा लाजिरवाणा प्रताप आमदारांच्या समर्थकांनी केला आहे.
मतभेद असल्याची दिली कबूली
आढावा बैठक म्हणजे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी चर्चा करणे. यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकार्यांमध्ये मतभेद, नाराजी असतेच. मात्र कोणताच वाद नाही, असे सांगून मानसी दळवींनी एकप्रकारे कृषीवलने छापलेल्या वृत्ताला दुजोराच दिला आहे.
कुर्डूसमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकित शाखा प्रमुख, तालुका प्रमुखांना मत व्यक्त करण्याची संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पक्षात नवे-जुने कार्यकर्ते आले कि, मतभेद होतात. निधी वाटपातून हे मतभेद होते. ते आम्ही स्थानिक पातळीवरच सोडविले. मात्र आमदारांच्या कामकाजावर नाराजी नाही.
राजा केणी, तालुका प्रमुख शिवसेना