ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात
ठोस उपाययोजना करण्याची गरज
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर वणवे लागतात. परिणामी, या आगीत झाडे-झुडपे, पशु-पक्षी, सूक्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होऊन सजीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वणवे हिरवीगार वनसंपदा नष्ट करीत आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंनादेखील नुकसान पोहचवत आहेत.
डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून आपला रायगड जिल्हा ओळखला जातो. माळरान, किल्ले, गड, जंगल या सर्व ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. परंतु, ऑक्टोबरनंतर वाढत्या उष्म्याने ही झुडपे व गवत सुकते आणि अशा माळरान, डोंगर व शेतात सुकेल्या झुडप व गवताला नैसर्गिकरित्या वणवा लागतो, तर काही लोक कळत-नकळत आग लावतात. या आगीचे रुपांतर प्रचंड नैसर्गिक व कृत्रिम वणव्यात होते. गवत जळल्याने गवतावर अवलंबून असणार्या गुरा-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजीवसृष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वनविभागाने ही बाब गंभीरतेने घेऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाली व सुधागड तालुक्यात पेटते वणवे सजीवसृष्टी नष्ट करीत आहे, हा धोका टाळण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
कृत्रिम वणव्यांमुळे संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा र्हास होतोे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र, हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपयांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे वणव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घरातला पाहिजे.
सजीवसृष्टीला धोका
नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सजीवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदूषण वाढते. येथील जैवविविधता संपुष्टात येते. सरटणारे जीव, (घोरपड, साप, सरडे, विंचू इत्यादी) कीटक आणि झाडे-झुडपे, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. फुलपाखरांना त्यांचे अन्न मिळविता येत नाही. विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे निवारे संपुष्टात येतात. त्यांची पिल्लेदेखील या आगीत होरपळून मरतात. तसेच पक्ष्यांचे आणि गुरा-ढोरांचे अन्न नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दुर्गम भागात राहणार्या आदिवासींनादेखील या आगीमुळे धोका संभवतो.
ऐतिहासिक वास्तू व किल्ल्यांचे नुकसान
वणव्यांमुळे जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होऊन ते ढासळण्याची भीती असते. किल्ल्याच्या तटबंदीवर, बरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणवे लागल्यामुळे किल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदादेखील नष्ट होत आहे. त्यामुळे येथे राहणार्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्यासाठी खूप वाताहत होत आहे. येथे राहणारे मोर, माकड व भेकर हे प्राणी अन्नपाण्यासाठी दाही दिशा भटकतात. परिणामी, या ठिकाणी वणवे लागणार नाहीत, याची दक्षता व खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे.







