शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्यात थेट लढत
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष एकला चलोच्या भूमिकेत असून आता मात्र ही नगरपंचायतीची निवडणूक खर्या अर्थाने रंगतदार होणार आहे. येथे चौरंगी लढत पहायला मिळणार आहे, तर बंडखोर व अपक्ष उमेदवार यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे.
खालापूर नगरपंचायतसाठी दि.21 डिसेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्र लढत असून यावेळी ही निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट करत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी आपली तयारी पूर्णपणे सुरू केली होती. तर मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने देखील स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा नारा देत त्यांनी देखील आपल्या परीने उमेदवार शोधण्यासाठी धडपड सुरू केली. दरम्यान शेकापच्या नेत्यांनीही आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करीत एकला चलो रे च्या भूमिकेतून स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित केले आहे.
एकंदरीत पाहता सेनेचे स्थानिक आ.महेंद्र थोरवे यांनी या आधीच जाहीर केलेले की, खालापूर नगरपंचायतीची निवडणूक ही शेतकरी कामगार पक्षासोबत युती करून लढणार आहोत, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला जमत नसल्या कारणाने सेना, शेकाप युती होत नसल्याचे येथील स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे.
- यापूर्वी खालापूरमध्ये दुसर्या पक्षाची सत्ता होती, मात्र 2015 साली झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा येथे सत्ताधारी पक्ष बनला असून त्यांच्या मार्फत अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. यावेळी ही या निवडणुकीत खालापूरची जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास आहे. – संदीप पाटील, तालुका चिटणीस, शेकाप, खालापूर