शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार

स्मार्ट मीटर विरोधात लढ्याची तयारी; संघटनबांधणीसाठी तालुकानिहाय बैठका

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत शेतकरी कामगार पक्षाने रायगडात जनजागृतीचा एल्गार पुकारला आहे. पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा जनजागृती दौऱ्याला तालुकानिहाय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्मार्ट मीटर आणि आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेकापची संघटनात्मक ताकद दाखवून देण्याची तयारी सुरू झाली आहे.

5 ऑक्टोबर रोजी पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि मुरुड तालुक्यांपासून दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी माणगाव, रोहा, सुधागड-पाली, खालापूर, कर्जत आणि पेण येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या जनजागृतीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये शेकापच्या राज्य प्रवक्त्या तथा सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम आणि राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. बैठकांमध्ये स्मार्ट मीटरचा प्रश्न गावागावात नेण्यावर विशेष भर देण्यात आला. वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी आणि ग्राहकांच्या प्रश्नांवर जनजागृती करून आगामी काळात व्यापक आंदोलन उभारण्याबाबत चर्चा झाली.

अलिबागमध्ये उद्या बैठक
अलिबाग तालुक्याची जनजागृती बैठक उद्या, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी भवन, अलिबाग येथे होणार आहे. संघटनबांधणी, स्मार्ट मीटरविरोधातील जनजागृती आणि आगामी आंदोलनांची दिशा यावर बैठकीत निर्णायक चर्चा होणार आहे. रायगडातील प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष उभारण्याच्या तयारीने शेकापचा जनजागृती दौरा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
Exit mobile version