तापमान 22 सेल्सियस खाली
| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील विभिन्न भागात थंडीचा जोर वाढत असून, तापमान 21 ते 22 सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. मुरूड शहरातील हॉटेल हनुमानमध्ये सकाळी गरमागरम चहा घेऊन थंडीच्या दिवसात मॉर्निंग वॉक घेणार्या मंडळींची संख्या वाढली आहे. खोरा बंदर, एकदरा, राजवाडा परिसर, तेलवडे, शिघ्रे, खारआंबोली मार्गावर मॉर्निंग वॉक घेणार्या मंडळींची संख्या अधिक दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा जोर ओसरला असून, गुलाबी थंडी पडल्याने पर्यटनाला अधिक बहर येण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर पश्चिमेकडून येत असलेल्या थंडगार वार्यांमुळे थंडीची तीव्रता वाढती आहे. यंदा थंडीचा जोर अधिक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळी आणि रात्री तापमान खाली घसरत असले तरी दुपारी तापमान 30 पर्यंत जात असल्याचा प्रकारदेखील मुरुडकर अनुभवत आहेत. नोव्हेंबर महिन्यात पहिले आठ-दहा दिवस ऑक्टोबरसारखी हिट जाणवली होती. मात्र, आता तापमान निवळत असून, रात्री किंवा पहाटे तापमान पारा 21 किंवा 22 पर्यंत खाली येत आहे. वाढत्या थंडीचा परिणाम वृद्ध आणि ज्येष्ठ मंडळींना होताना दिसत आहे. दवाखाने, ग्रामीण रुग्णालयात थंडी, ताप, सर्दीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. मुरूड तालुक्यातील ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी काही ठिकाणी ग्रामस्थांकडून शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
राज्यातील निवडणुका आटोपल्याने पर्यटक गुलाबी थंडीतील पर्यटनासाठी बाहेर पडले असूनख् मुरूड, काशीद, नांदगाव, बारशिव, जंजिरा जलदुर्ग, पर्यटन करण्यासाठी दाखल होताना दिसत आहेत. सकाळी महालोर, गोपळवट नागशेत गावच्या परिसरात धुक्याची चादर पसरत असल्याची माहिती शिघ्रे येथील रघुनाथ माळी यांनी दिली. थंडीमुळे समुद्राचे पाणी थंड होत असल्याने मासळीदेखील उबदार खोल पाण्यात गेली असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे मार्केटमध्ये मासळीची आवक कमी दिसत आहे.







