यवतमाळमध्ये ‘हे’ उमेदवार रिंगणात

| यवतमाळ | प्रतिनिधी |

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात 17 उमेदवार कायम असून, येथे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच थेट निवडणूक होईल, हे स्पष्ट झाले.

निवडणुकीत महायुतीकडून रिंगणात असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील महल्ले या बाजी मारतात की, महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे उमेदवार असलेले संजय देशमुख हे बाजीगर ठरतात, हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात दुसर्‍या टप्यारतत 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत 18 अर्ज बाद झाल्याने 20 उमेदवार रिंगणात होते. यापैकी अपक्ष उमेदवार वैशाली संजय देशमुख, कुणाल जानकर आणि सवाई पवार यांनी आज नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र त्यांनी आज माघार घेतल्याने संजय देशमुख यांनीच खबरदारी म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येते. मतदारसंघात आता 17 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

Exit mobile version