लालपरीत अपुरे कर्मचारी;कामावर पडतोय ताण

| अलिबाग | प्रमोद जाधव |
जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळामार्फत वेगवेगळ्या सवलती सुरू केल्याने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार 320 चालक व वाहक आहेत. अपुऱ्या चालक वाहक कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांना सेवा देताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी डबल ड्युटीचा भार कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, महाड, माणगाव, श्रीवर्धन असे आठ एसटी बस आगार तर 19 बस स्थानके आहेत. या आगारात 413 एसटी बसेस आहेत. या आगारात 412 एसटी बसेस आहेत. त्यामध्ये साध्या 343, मिडी दोन, शिवशाही 39, स्लीपर आठ व निमआराम 21 बसेसचा समावेश आहे. या एसटी बसेसमधून दररोज सुमारे 92 हजार प्रवासी प्रवास करतात. एसटी बसेस दिवसाला सुमारे एक लाख 8 हजार किलो मीटरचा प्रवास करते. महामंडळाला यातून 37 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या सवलतीमधून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रवाशांचा आरामदायी प्रवास व्हावा यासाठी अलिबाग – पनवेल, कर्जत – पनवेल, पेण – पनवेल विना थांबा एसटी बसेस सेवा सुरु केल्या आहेत.

जिल्ह्यात औद्योगिकीकरणासह पर्यटनदेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत आहेत. उन्हाळी, हिवाळी हंगामात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यात वेगवेगळ्या सवलती लागू केल्याने महिला प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र या लाखो प्रवाशांना सेवा देण्यासाठी असणारे मनुष्यबळ रायगड विभागात कमी असल्याचे समोर येऊ लागले आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार 320 चालक वाहक आहेत. परंतू या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहेत. त्यांना डबल ड्युटी करण्याची वेळ येऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये 170 चालक व 140 वाहक असे एकूण 310 कर्मचारी कमी पडत आहेत. या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा एसटी बस सेववर प्रचंड परिणाम होत आहे. रात्रीचा दिवस करून कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विना तिकीट प्रवास महागात
रायगड जिल्ह्यातील एसटी बस आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. परंतू काही महाभाग प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी विभाग नियंत्रक दिपक घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तीन तपासणी पथक नेमण्यात आले आहेत. या पथकांमार्फत एसटीतील प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. विना तिकीट प्रवास करणारे आता प्रवाशांना महागात पडणार आहे.

एसटी महामंडळ रायगड विभागात 400 कर्मचारी कमी आहेत. त्यात दोनशे चालक व दोनशे वाहकांचा समावेश आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे चालक व वाहकांवर ज्यादा ड्युटीचा भार पडत आहे.त्यातूनही प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत आहेत. तसेच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार केले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

दिपक घोडे – विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ,रायगड विभाग
Exit mobile version