| पाली / गोमाशी | प्रतिनधी |
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी भावशेत ठाकूरवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारलेला वनराई बंधारा हा आजच्या काळाची गरज ओळखून घेतलेला कौतुकास्पद निर्णय असल्याचे प्रतिपादन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.
ग्रामस्थांनी श्रमदानातून आणि एकजुटीने हा बंधारा तसेच या ग्रामपंचायत मधील इतर बंधारे ही पूर्ण केले आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीला पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. आजच्या बदलत्या हवामानाच्या काळात अशा छोट्या-छोट्या जलसंधारणाच्या कामांची अत्यंत आवश्यकता असून, भावशेत ठाकूरवाडी गावाने इतर गावांसमोर आदर्श निर्माण केल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले. बंधाऱ्याच्या पाहणी व लोकार्पण कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पवनकुमार नजन कृषी विकास अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, लता मोहिते गट विकास अधिकारी पंचायत समिती सुधागड-पाली, अशोक महामुनी कृषी अधिकारी संजय शेलवाड विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, मिलिंद देवकर विस्तार अधिकारी कृषी, विकास शिंदे विस्तार अधिकारी, अस्मिता बैकर, ग्रामपंचायत अधिकारी बबन टावरी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तसेच ठाकूरवाडी ग्रामस्थ व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भावशेत ठाकूरवाडीत वनराई बंधाऱ्याचे लोकार्पण
