। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित “सर्वरोग निदान आरोग्य मेळावा” चे उदघाटन अदिती तटकरे, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड यांच्या हस्ते गुरुवार जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी रायगड अमोल यादव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय मा.एस.एम.सोनुने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक रायगड डॉ.प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ.गजानन गुंजकर, प्रशासकीय अधिकारी वर्ग १, वैद्यकीय महाविद्यालय सुनील चव्हाण, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय पी.डी. धामोडा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागाचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधिसेवीका, अधिपरिचारिका, अधिकारी व कर्मचारी व सर्व रोग निदान शिबीराकरिता आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिनांक १८ ते २२ एप्रिल २०२२ दरम्यान आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, दंत चिकित्सा, भिषक, रक्त तपासणी, रक्तदान, अवयवदान, टेली कंसल्टेशन व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड याबाबत रुग्णांनी लाभ घ्यावा या करिता सदर शिबिराचे आयोजन केल्याचे मा. जिल्हा शल्यचिकित्सक रायगड डॉ.सुहास माने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
अदिती तटकरे, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा सामान्य रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित केलेला आरोग्य मेळावा स्तुत्य असून रुग्ण सेवेच्या दृष्टीने उपयोगी असल्याचे सांगून कौतुक केले. तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीकरिता व कोविड महामारीच्या कालावधीमध्ये परिचारिका महाविदयालयाची इमारत अत्यावश्यक सेवेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि या कालावधीमध्ये रुग्ण सेवेसाठी विशेष परिश्रम घेतलेबद्दल मा. जिल्हा शल्यचिकित्सक रायगड डॉ.सुहास माने तसेच त्यांचे सहकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत सदर शिबिरास सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अदिती तटकरे, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे ८० लाभार्थाना वितरण करण्यात आले.
यावेळी अदिती तटकरे, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये नियोजित केलेल्या शिबिरातील स्टॉलला व एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रदर्शनपर स्टॉलला भेट दिली.