शरीरसौष्ठव महाराष्ट्र राज्य निवड चाचण्यांचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत भारतीय बॉडी बिल्डर्स फेडरेशनशी संलग्न महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन, क्रिडा मंत्रालय मान्यताप्राप्त 13 व्या मिस्टर इंडिया 2021, राष्ट्रीय शरीरसौष्ठव व 11 वा फेडरेशन कप 2021 साठी महाराष्ट्र राज्य निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. ही चाचणी बुधवारी (दि. 22) रोजी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे पार पडली. या चाचणीचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष मधुकर तळवळकर, जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे,महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. विक्रम रोटे, दक्षिण आशियाई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत आपटे, इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला सरचिटणीस हिरल शेठ, कोकण बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोसमकर, सचिव सचिन पाटील, शेकाप कार्यकर्ते सागर अल्हात, सोहम वैद्य, इतर पदाधीकारी आणि राज्याच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले कि, शेकाप हा असा राजकीय पक्ष आहे, जो तळागाळापर्यंत पोहोचून सामाजिक कार्य करण्यावर विश्‍वास ठेवतो. सध्या ग्रामविकास, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, क्रिडा असे अनेक क्षेत्रे दुर्लक्षित आहेत. क्रिडा क्षेत्राला प्रचंड वाव आहे. त्याचे महत्व ओळखून शेकापच्या माध्यमातून व आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने अलिबाग तालुक्यात पाच क्रिडा संकुल उभारण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही स्पर्धा पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात न होता अलिबागमध्ये आयोजित झाल्याचा खूप आनंद आहे. भविष्यात आपल्या विभागातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळले तर माझे ध्येय खर्‍या अर्थाने पुर्ण होईल.


बॉडी बिल्डिंग हे सोपे काम नाही. ती कला, खेळ आणि विज्ञान आहे. बॉडी बिल्डर होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सर्व बॉडी बिल्डर्स स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेत आहेत, हे पाहून आनंद झाला. तसेच कमी वेळात सुंदर आयेजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन.
मधुकर तळवळकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन

महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन मागचे अनेक वर्ष कार्यरत आहे. कमी वेळात आमच्या नवीन कोकण बॉडीबिल्डिंग असोसिएशनने उत्तम आयोजन केले आहे. चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्यामुळे नाट्यगृह उपलब्ध झाले. अलिबाग इतके सुसज्ज आहे की, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा देखील याठिकाणी आयोजिक करु शकतो.
चेतन पाठारे, सरचिटणीस, जागतिक शरीरसौष्ठव महासंघ

Exit mobile version