मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन

देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत

| पनवेल | वार्ताहर|


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन रविवारी (दि. 10) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राला नव्हे तर, संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आले आहे. यावेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचेदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास आ. गणेश नाईक, आ. मंदाताई म्हात्रे, आ. महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, माजी खा. संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी तसेच ई-पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली.

कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये डायल 112, आय बाईक,यथार्थ, नेल्सन सिस्टीम, जागरूक नवी मंबईकर, सायबर /एफआययु, वुमन हेल्प डेस्क, ट्राफीक हेल्प डेस्क स्टॉल्सचा समावेश होता. गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो, परंतु पोलीस ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे या सारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात अडचणी निर्माण होत असत. हा सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची व मनुष्यबळाची बचत होऊ शकते या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबविण्यात आली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version