पनवेलच्या डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

शेकडो गरीब रुग्णांना होणार लाभ
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर करिता तज्ज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज दि.2 जानेवारीला येथील डायलिसिस सेंटरचे उद्घाटन होणार आहे. याचा लाभ शेकडो गरीब रुग्णांना होणार आहे.
किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी राज्याच्या राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. नवीन वर्षात डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने पनवेलकरांना ही नववर्षाची भेट आहे.

पनवेलचे डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने त्याचा लाभ गोर-गरीब आणि गरजू नागरिकांना होणार आहे. सेंटर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला, त्याला यश आले. सर्वाना धन्यवाद.
-प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

Exit mobile version