| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 ऑगस्टपासून 38 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यास शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन या पंधरवड्यास प्रारंभ झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, प्रशासकीय अधिकारी डॉ. महालिंग क्षीरसागर, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय इंगळे, डॉ. प्रियंका गायकवाड, डॉ. मेघा कळाम, अधिसेविका अनिता भोपी आदी उपस्थित होते.
भारत देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी 20 ऑगस्ट 1985 रोजी सपत्नीक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला होता. तेव्हापासून संपूर्ण देशभर 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नेत्रदानासाठी जनजागृती व्हावी, अनेक समज गैरसमज दूर व्हावे, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात 15 दिवस कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दि. 8 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभ तसेच नेत्रदान कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात मरणोत्तर नेत्रदानाबद्दल नातेवाईकांचा सन्मान तसेच घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धेत विजय विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.
या नेत्रदान पंधरवडाच्या काळात जास्तीत जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा तसेच विविध स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सचिन गोमसाळे, नेत्रदान समुपदेशक अक्षयकुमार गोरे यांनी केले आहे.







