जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ

। रायगड । खास प्रतिनिधी ।

जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले. जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विठ्ठल इनामदार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जोशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे हे उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात नागरिक आणि संस्था सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात क्षयरुग्णांना औषधे व सीएसआरमधून प्रोटिन्सयुक्त आहार देता येईल. या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रम राबविण्यासाठी 75 गावे निवडण्यात आले असल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यातील टीबी निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे व क्षयरोग मुक्तीसाठी क्षय रुग्णांना दत्तक घेणारे निक्षय मित्र डॉ. कृष्णा देसाई, सागर काटे यासह संस्थाचे प्रतिनिधी तसेच क्षयरोगाला हरवून क्षयरोगमुक्त रुग्ण (टीबी चॅम्पियन्स) संजय पोईनकर, विद्या मगर, वैभव म्हात्रे, योगेश गावंड यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सुतार यांनी केले.

Exit mobile version