पीएनपी संकुलात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटी वेश्‍वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाकडून अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादरीकरण करताना तयार केलेले भित्तीपत्रके ही क्रिप्टो करन्सी, सेन्सेक्स, निफ्टी, इतर देशातील चलनाचे भारतीय रुपयांतील मूल्य, जीएसटीचे नवीन बदललेले दर आणि प्रकार, इंधन दर या विषयांवर आधारित होते.

या सर्व विषयांचे सादरीकरण करताना जय राऊत, साक्षी गावंड आणि सफा कागडी या विद्यार्थ्यानी त्याची माहिती आणि संकल्पना उपस्थितांना सांगितल्या आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. अभ्यासपूर्ण सादरीकरण अशा शब्दांमध्ये प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी अर्थशास्त्र विभागाने पुढेही असे कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रसिका म्हात्रे यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग आणि अर्थशास्त्र विभागातील विदयार्थी उपस्थित होते.

Exit mobile version