। गडब । वार्ताहर ।
चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया रायगड युनिट व बीएन वाय मेलन या संस्थांतर्फे मुला मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थाप्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते गडब येथे करण्यात आले. यावेळी प्राचार्य कमलाकर पाटील, गणेश पाटील, समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप मात्रे, आदर्श युवा संघटनेचे सचिव कमलेश ठाकूर, सदानंद ठाकूर, ओमकार पाटील, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी संगणक ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्वावलंबी स्वयंपूर्ण करणे हा सीएफआयचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना संगणकापासून यंत्रमानव रोबोटिक प्रशिक्षणसुद्धा आम्ही यापुढे देऊ, अशी ग्वाही डॉ. किशोर देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी दिली. समाज संस्थेच्या पुढाकारातून ह्या विभागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सोय करीत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत असल्याचे समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी म्हटले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना संगणक संचालक शिंदे, श्रुती पाटील, सचिन संसारे यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
सीएफआय व बीएनवाय मेलन या संस्थेतर्फे पेण तालुक्यातील तरणखोप, हमरापूर, रावे, दादर, वरसई, खारपाडा व गडब या गावातून मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत असून, आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळाले आहे, यातूनच स्वयंपूर्ण व स्वावलंबी विद्यार्थी घडतील, असा विश्वास किशोर देशमुख यांनी व्यक्त केला.