अलिबागमध्ये हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन

| अलिबाग | वार्ताहर |

भाऊराया हॅण्डलुम सोलापुर यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धी व विक्री कार्यक्रमांतर्गत हातमाग कापड प्रदर्शन (दि. 6) ते (दि.31) मेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विविध वस्तूंची विक्रीसुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अलिबाग शहरातील सार्वजनिक वाचनालय, डोंगरे हॉल येथे या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून पार पडले. याप्रसंगी पांडुरंग पोतन, गोवर्धन कोडम, बाळू कोडम, पुरुषोत्तम पोतन, दीपक गुंडू, श्रीकांत श्रीराम, लक्ष्मण उडता, अशोक नंदाल आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन म्हणाले की, यांत्रिक युगामध्ये स्पर्धा करीत सर्व समस्यांशी सामना करून त्यांचे पिढीजात पारंपारिक हातमागावर समृद्धीचे वस्त्र विणण्याचे आणि वस्त्र संस्कृतीच्या अमूल्य ठेवा जोपासण्याचे काम आपले विणकर अविरतपणे काम करीत आहे. त्यांच्या या गतिशील प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी तयार केलेल्या हातमाग कापडाला योग्य बाजारपेठ मिळावी त्याकरिता हातमाग वस्त्रोद्योग मध्ये काम करणाऱ्या संस्थांचे योगदान मिळून बळकटीकरण व सक्षमी करण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या कलेवरच कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

या प्रदर्शनास अलिबागकरांनी बहुसंख्येने भेट देऊन विणकर कामगारांची कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हातमाग व यंत्रमागावर उत्पादित वस्त्रे जसे कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी व शर्ट, कुर्ता, बंडी आदी विक्रीसाठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सूट ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Exit mobile version