कळंब तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे कळंब येथील तलाठी कार्यालय मोडकळीस आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी लोकसहभागातून या कार्यालयासाठी पुढाकार घेतला. नवीन जागेत बांधण्यात आलेल्या तलाठी सजा कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

कर्जत तहसील कार्यालयाच्या अंतर्गत कळंब येथे मंडळ अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाशी संबंधित असलेले कळंब सजा तलाठी कार्यालय नेरळ-कळंब रस्त्यावरील बोरगाव फाटा येथे हे कार्यालय होते. त्याच ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय असल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना दाटीवाटीत आपली कामे करावी लागायची. त्यात अत्यंत कमी जागेत ही कार्यालये असल्याने तेथून कामकाज पाहणे कठीण जात होते. त्यामुळे कळंब तलाठी सजामधील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी आर्थिक मदत उभी केली. अनेक हातांनी लोकसहभाग दाखवून कळंब आणि साळोख तलाठी सजामधील ग्रामस्थांच्या मदतीने येथील महसूल विभागाचे तलाठी कार्यालय उभे केले.

या नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी सजा कार्यालयाचे लोकार्पण तलाठी राजेश साबके यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ ॲड. झैद बोंबे, तसेच अनिस बुबेरे, कारकून रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version