| चिरनेर | प्रतिनिधी |
महाविद्यालयीन जीवनात मी लायब्ररीत बसून अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. त्यामुळे साहजिकच वाचनाची गोडी लागली. आजही सर्व वृत्तपत्रांबरोबर विमान प्रवासातही पुस्तके वाचतो. चौकमध्ये 1920 पासून वाचनालय सुरू आहे. त्याला 106 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून, तुपगावमध्ये ओमकार वाचनालय व ग्रंथालय सुरू करून आपण एक उत्तम काम केले आहे, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत त्यांनी काढले.
तुपगाव चौक येथील ओमकार वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन रविवारी (दि.28) झाले. यावेळी घरत हे उद्घाटनपर भाषणात बोलत होते. तर, व्यासपीठावर माजी जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, काँग्रेस युवा अध्यक्ष निखिल ढवळे, तालुकाध्यक्ष देविदास म्हात्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, उद्योजक आप्पा देशमुख, विनोद भोईर, दिनेश गावडे आदीजण उपस्थित होते. माजी सरपंच शांताराम भधे यांनी प्रास्ताविक तर सुरेश मागावकर यांनी सूत्रसंचालन केले.







