माणगावमध्ये भात खरेदी केंद्राचे उद्घाटन

। माणगाव । प्रतिनिधी ।
शेतकर्‍यांना हमीभाव मिळाला पाहिजे तसा गोडाऊनात धान्य जमा करणार्‍या संस्थांचे नुकसान होणार नाही याची काळजी फेडरेशनने घ्यावी असे प्रतिपादन मा.आ.पंडित पाटील यांनी माणगाव येथे माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या आधारभूत भात खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेअंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप.मार्केटिंग फेडरेशन ली. माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या माणगाव येथील आधारभूत भातखरेदी केंद्राचे उद्घाटन सोमवारी (दि.15) मा.आ.पंडित पाटील यांच्याहस्ते व राजिप अध्यक्षा योगिता पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मा.आ.पंडित पाटील यांनी सांगितले, राज्य सरकारने भात खरेदी केंद्र सुरु करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. मी राजिप अध्यक्ष असताना तसेच आमदार झाल्यावरही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भाताचा योग्य हमीभाव मिळावा यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले. शेकाप हा नेहमीच शेतकर्‍यांचा पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. शेकापने जिल्ह्यात सहकाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगून माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या आधारभूत भात खरेदी केंद्राला शुभेच्छा देत पुढील वर्षी आम्ही जेव्हा या केंद्राच्या उदघाटनाला येऊ तेव्हा या संघाला 10 लाखाचा नफा मिळालेला असेल अशा शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाला शेकापचे मोर्बा येथील ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, मार्केटिंग फेडरेशनचे जिल्ह्याचे अधिकारी बी.के.ताटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, बाळकृष्ण आंबुर्ले, महेश सुर्वे, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, निजाम फोपळूणकर, हसनमिया बंदरकर, खरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील सकपाळ, माणगावचे माजी उपसरपंच अनंता थळकर, दिपक रसाळ,धनंजय गायकवाड, देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version