| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने मंगळवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी खारघरमधील केंद्रीय विहारजवळील प्राईड इमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहायक आयुक्त स्वरूप खारगे, प्रभाग अधिकारी स्मिता काळे, प्रभारी कर अधीक्षक सुनील भोईर, महेश गायकवाड, प्रभारी अधीक्षक जितेंद्र मढवी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मालमत्तांधारकांच्या बिलांमधील अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्यावरती महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने भर दिला आहे. नागरिकांना कर भरणे सोपे जावे, त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये दुरूस्ती व्हावी, तक्रारींचे निवारण लवकर व्हावे तसेच महापालिका मुख्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने हे मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. याबरोबरच ऑनलाईन कर भरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.