| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
रायगड जिल्हा राष्ट्रसेविका समितीच्या प्रारंभिक वर्गाचा शुभारंभ नुकताच मुरुड येथील हिंदू एज्युकेशन सोसायटीमध्ये उषा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख वक्त्या म्हणून कोकण प्रांत बौध्दिक प्रमुख प्रेरणा क्षीरसागर या उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रसेविका समिती भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी कार्य करणारी एक अग्रेसर हिंदु संघठन असुन नारी शक्ती ही राष्ट्राची आधार शीला आहे. महिलांना आत्मनिर्भर करून अनुशासन व स्वयंशिस्तीच्या बळावर या राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्याचे उदिष्ट असल्याचे स्पष्ट केले. वंदनीय लक्ष्मीताई केळकर यांनी 1936 मध्ये वर्धा येथे राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली.
भारता खेरीज 22 देशात समिती कार्यरत असल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच, दि.14 ते 19 मे या काळात समितीच्या स्वयंसेविका मैदानी खेळ, बौद्धिक, पर्यावरण स्वसंरक्षण संवर्धन कार्यशाळा आदी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 12 ते 35 या वयोगटातील रायगड जिल्हातील 9 तालुक्यातील 50 सेविका प्रारंभिक वर्गास उपस्थित असल्याची माहिती जिल्हा कार्यवाहिका रुची काळे यांनी दिली.