अलिबागमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचा शुभारंभ

रायगडचे अभिजित, एजाज मुजावर दुसऱ्या फेरीत

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्यातून आणि अलिबागमधील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने तीन दिवसीय राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवारी उत्साहात पार पडला. या स्पर्धेत रायगडच्या अभिजित तुळपुळे व एजाज मुजावर यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.


या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिअशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, सेक्रेटरी अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार अभिजित सावंत, सहसचिव प्रसाद शेंबेकर, कमळ नागरी सहकारी पतसंस्थे चेअरमन सतीशचंद्र पाटील, महाराष्ट्र कॅरम असोसिअशनचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा कॅरम असोसिअशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, सचिव दीपक साळवी, पालघर जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष पंकज ठाकूर, श्रीनिवास पाटील, नंदकुमार चाळके, राजेश प्रधान, प्रवीण जैन, संतोष पुरो, स्पर्धेचे प्रमुख पंच परविंदर सिंग, आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर उपस्थित होते. सतीशचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख ललित भिसे यांनी सूत्रसंचालन तर वैभव पेठे यांनी आभार व्यक्त केले. या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू संदीप दिवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील कुरुळय येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत राज्यातील 240 स्पर्धक सहभागी झाले आहेत.

पहिल्या फेरीत रायगडच्या एजाज मुजावर याने मुंबईचा विक्रांत धिवर याचा 13-19, 24-10, 24-20 असा पराभव केला. रायगडच्या अभिजित तुळपुळे याने ठाण्याच्या संजय कांबळे याच्यावर 22-10, 25-15 अशी मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरी प्रथम फेरीचे निकाल
किरण भोपनीकर (मुंबई उपनगर) वि. चेतन कोळी (मुंबई) 25-4, 23-18
एजाज मुजावर (रायगड) वि. विक्रांत धिवर (मुंबई) 13-19, 24-10, 24-20
अभिजित तुळपुळे (रायगड) वि. संजय कांबळे (ठाणे) 22-10, 25-15
सिद्धेश भोईर (मुंबई उपनगर) वि. अमोल मोरे (रायगड) 19-9, 13-14, 25-6
संतोष पुजारी (मुंबई) वि. किरण सोमण ( रायगड ) 17-16, 17-16
मंदार बर्डे (ठाणे) वि. तरुण शाह (मुंबई उपनगर) 25-5, 25-4
रजाक शेख (पुणे) वि. साहिल कदम (रायगड) 25-0, 25-0
रवींद्र हांगे (पुणे) वि. भावेश परमार (ठाणे) 25-0, 25-6

कॅरम हा कौटुंबिक खेळ आहे. कुटुंबातील सदस्य मिळून हा खेळ घरात खेळू शकतात. घराघरात पोहचलेला हा खेळाळा येत्या काही वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत देखील स्थान मिळेल.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version