| माणगाव | प्रतिनिधी |
उन्हाळ्याच्या कडक तापमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीचा विचार करत दिवा-चिपळूण या मार्गावर विशेष मेमू गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुलभ, जलद आणि आरामदायी होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आपल्या गावी, नातेवाईकांकडे किंवा निसर्गरम्य किनाऱ्यांकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची झळक दिसून येत आहे. दिवा-चिपळूण-दिवा मेमू या विशेष गाड्या 1 मे ते 7 जून या कालावधीत धावणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्या दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सुरू राहणार असून, एकूण 36 सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिवा ते चिपळूण गाडी रात्री 11:25 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता पोहोचेल, तर चिपळूण ते दिवा गाडी दुपारी 3:30 वाजता सुटून रात्री 11:10 वाजता पोहोचेल. या गाड्या निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जांभिवली, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वांगणी, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजनी अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, उन्हाळ्याच्या प्रवासाला एक नवी ऊर्जा आणि आनंद मिळणार आहे. मात्र, ही मेमू रेल्वे कायमस्वरूपी बाराही महिने सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
दिवा-चिपळूण मेमू रेल्वेचा शुभारंभ
